महापालिकेकडे थकले ६३ कोटी, नव्या महापौरांना नोटिसीचा निर्णय

Foto
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : महापालिकेकडे पाणीपट्टीचे ६३ कोटी २५ लाख रुपये थकले आहेत. या रकमेच्या वसुलीसाठी नव्या महापौरांना नोटीस देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. दरम्यान, महापालिकेतील प्रशासकांच्या काळात जलसंपदा विभागास पाणीपट्टीच्या बिलापोटी सुमारे ११ कोटी रुपये मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जायकवाडी धरणातून दोन पाइपलाइनद्वारे महापालिका शहरासाठी दरवर्षी ५८ दलघमी पाण्याचा उपसा करते. नवीन पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पाण्याचा उपसा दरवर्षी ६५ दलघमीपर्यंत जाईल. 
महापालिककडे मूळ पाणीपट्टीचे २५ कोटी १० लाख, तर दंड व विलंब शुल्काचे ३८ कोटी १७ लाख रुपये, असे एकूण ६३ कोटी रुपये थकले आहेत. वसुलीसाठी महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासोबत १६ डिसेंबर २०२५ रोजी बैठक घेतली जाणार होती. 

कडाच्या मुख्य अभियंता सुनंदा जगताप, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार हे बैठकीस हजर होण्यासाठी महापालिकेत गेले, परंतु निवडणूक कामाचे कारण सांगून बैठक पुढे ढकलण्यात आली. पाणीपट्टीची थकबाकी सातत्याने वाढत असून ’वन टाईम सेटलमेंट’च्या धर्तीवर एकाचवेळी पैसे अदा करावेत, अशी मागणी जलसंपदा विभागाकडून केली जाणार आहे. त्यासाठीची नोटीसदेखील तयार करण्यात आली असून, नवीन महापौरांनी पदभार घेताच ती बजावली जाईल.